मुंबई - राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा कमी होत असला तरी संकट कायम आहे. कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत 54 पोलिसांनी जीव गमावला असून त्यामध्ये 30 पेक्षा जास्त मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दोन हजारांहून अधिक आहे. यात बाराशेहून अधिक पोलिसांनी कोरोनावर मात केली असून काही जण पुन्हा सेवेत दाखल झाले. आता, मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे.
कोरोनाच्या लढाईत वैद्यकीय क्षेत्र आणि पोलीस दलाने झोकून देत काम केलंय. विशेष म्हणजे अद्यापही हे काम सुरुच आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत आढळले असून उपचारानंतर बाराशेपेक्षा जास्त पोलीस बरेही झाले आहेत. मात्र, या लढाईत तब्बल 54 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या लढाईत पोलिसांच्या कामाची दखल चक्क आर्मीतील अधिकाऱ्यानेही घेतल्याचं आपणास एका व्हिडिओत पाहायला मिळालं होतं. आर्मी अधिकाऱ्यानेही पोलिसांच्या कार्याला सॅल्युट केला होता. त्यामुळे, कोरोनाच्या काळातील पोलिसांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सातत्याने पोलिसांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाविरुद्ध लढताना पोलीसाचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 50 लाखांची मदत देण्याची घोषणाही सरकारने केली आहे. आता, कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना संबंधित पोलिसाच्या निवृत्तीपर्यंत पोलीस क्वार्टरमध्ये राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस कुटुबीयांना सरकारने दिलासा दिला आहे. ज्या पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे, त्या पोलिस कुटुबीयांस संबंधित पोलिसाच्या निवृत्तीच्या वयापर्यंत पोलीस क्वार्टरमध्ये राहण्यास परवानगी दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांनी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत, यासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर स्ट्रीट क्राईमनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हानही पोलिसांवर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. जीव धोक्यात घालून पोलीस आरोपींना पकडत जरी असले तरी, आरोपीच कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याने पोलिसांना क्वॉरंटाईन होण्याची वेळ ओढावत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच कुर्ला पोलिसांनी लुटीच्या गुन्ह्यात चौकडीला अटक केली. त्यात एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला पकडणाऱ्या पोलिसांना क्वॉरंटाईन व्हावे लागले. यापूर्वी बांगुरनगर पोलीस ठाण्यातही असाच प्रकार घडला होता.