मुंबई - भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तीन पायांचं हे ऑटोरिक्षा सरकार असल्याचं सांगताना, हे प्रगती सरकार नसून स्थगिती सरकार असल्याच फडणवीस म्हणाले. शिवसंग्राम फाऊंडेशन डे निमित्त आयोजित मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी, फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर टीका करताना सरकार जास्त काळ चालणार नसल्याचं म्हटलं. तसेच, दिल्लीत जाणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
अरबी समुद्राचा मुद्दा उपस्थित करत, जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबविण्याचं काम हे सरकार करत आहे. ऑटो रिक्षा सरकार असून या सरकारची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. त्यामुळे, हे सरकार फार काळ टीकणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. भविष्यकाळात संधी मिळाल्यास राहिलेली काम पूर्ण करूयात. मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी मी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा सरकार येत नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. महाराष्ट्रात संघर्ष करुन भाजपा आणि शिवसंग्राम युतीचं सरकार आणल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
जनतेनं आपल्याला बहुमत दिलं होतं, पण राजकीय गणित जुळवून हे सरकार बनविण्यात आलंय. त्यामुळे, सर्व पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांच्या श्रमातून यापेक्षाही मोठं यश भविष्यात आपल्याला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, सरकारने विश्वासघाताची मालिका सुरू केल्याचे सांगत सरकारच्या कर्जमाफी योजनेवरही त्यांनी टीका केली. नेमकं कर्जमुक्त कोणाला करणार आहात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.