"...तोपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही, मुंबई केंद्रशासित प्रदेश करायची"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 04:10 PM2023-08-31T16:10:01+5:302023-08-31T16:12:09+5:30
निती आयोगाच्या माध्यमातून आता मुंबईचा विकास होणार आहे, मुंबईचा विकास करणाऱ्या सर्वच संस्थांचा अधिकार आता निती आयोगाकडे गेला आहे
मुंबई - मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगावर सोपविली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते त्या पावलावरती पाऊल इथलं सरकार टाकत आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयाच्या मार्फत मुंबई चालवणार का? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यासंदर्भात आता मनसेनेही भूमिका स्पष्ट केली आहे.
निती आयोगाच्या माध्यमातून आता मुंबईचा विकास होणार आहे, मुंबईचा विकास करणाऱ्या सर्वच संस्थांचा अधिकार आता निती आयोगाकडे गेला आहे. त्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावरुन, आज राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले, तर शिवेसनेही आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात मनसेला विचारलेल्या प्रश्नावर संदीप देशपांडे यांनी मनसेस्टाईल उत्तर दिले.
केंद्र सरकारला सर्वाधिक टॅक्स देणारं शहर हे मुंबई आहे. त्यामुळे, मुंबई शहरालाही त्याचा परतावा सरकारकडून मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातून निती आयोग मुंबईचा विकास करणार असेल तर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण, यात कुठला राजकीय हेतू समोर आला तर ते आहेत, आणि आम्ही आहोत, असा थेट इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे. तसेच, उद्धव ठाकरे म्हणाले मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे म्हणजे तसं होत नाही. निती आयोगाने कुठेही तसं म्हटलं नाही. महाराष्ट्रात, मुंबईत जोपर्यंत मराठी माणूस आहे, मनसैनिक आहे, राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही, मुंबईला केंद्रशासित करायची, असेही देशपांडे यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना अभिवादन करत हुतात्मा चौक येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नीती आयोगाच्या मार्फत मुंबईचा विकास हातात घेतला तर मुंबई पालिका आणि मुंबईतल्या आमदार खासदारांना काय अर्थ राहणार नाही. म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान कार्यालय मुंबई चालवणार का? असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.
आम्ही जनतेच्यासोबत - मनसे
मनसे इंडिया आघाडीसोबत की एनडीए आघाडीसोबत असा प्रश्न मनसेच्या संदीप देशपांडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, आम्ही जनतेच्यासोबत आहोत, आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन काम करतोय. लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आज तरी राज ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर सर्वच निवडणुकांची तयारी करण्याचे सांगितले आहे. आमच्याकडून तशी तयारी सुरू आहे, लोकांमध्ये जाणं सुरू आहे, मतदार टू मतदार मार्कींग सुरू आहे, असे म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं.