मुंबई - समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून टीकेचा धनी बनला आहे. अपघातांची मालिका, सोयीसुविधांचा अभाव आणि सत्ताधाऱ्यांची होणारी घाई, यामुळे हा महामार्ग विरोधकांकडून सातत्याने सत्ताधारी लक्ष्य होत आहे. गेल्याच महिन्यात समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जवळपास २३ प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, यावरुन विरोधकांची राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं. आता, समृद्धी महामार्गावरील गैरसोय आणि टोलचा मुद्दा उपस्थित करत खासदारइम्तियाज जलील यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
समृद्धी महामार्गवरील नागपूर ते शिर्डी या मार्गाचे लोकार्पण करण्याची घाई सरकारने का केली, असा सवाल खासदार जलील यांनी विचारला आहे. या महाार्गावर स्वच्छतागृहे नाहीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल नाहीत, पुरेसे पेट्रोल पंप नाहीत, सुरक्षितता आणि सुरक्षा यंत्रणा नसताना नागपूर ते शिर्डीला जोडणारा समृद्धी द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी का खुला करण्यात आला?, असा सवाल विचारत जलील यांनी समृद्धी महामार्गावरील फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी यापूर्वीही समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरुन सरकारला खडेबोल सुनावले होते. समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढतंच चालले आहे. माणसाच्या मृत्युची किंमत स्वस्त झाली आहे. नुसत्या मुंबईत बसून घोषणा करणे योग्य नाही, सरकारने अपघाताचे स्पॉट निश्चित केले पाहिजे, असं जलील यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे खा. जलील यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती.