लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मंगळवारी (दि. २७) रात्री मुंबईच्या उपनगरांत पावसाचा शिडकावा झाला. बुधवारीही मुंबईत ठिकठिकाणी ढगाळ हवामान कायम होते. बुधवारी पावसाची नोंद झाली नसली तरी २४ तास येथील हवामान अधूनमधून ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा व विदर्भात तुरळक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. २९ एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.