राज्यात अवकाळी पावसाचा मारा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:06 AM2021-03-21T04:06:55+5:302021-03-21T04:06:55+5:30
मुंबई : विदर्भ व लगतच्या भागावर असलेले चक्रिय चक्रवात आता दक्षिण पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या विदर्भावर आहे. ...
मुंबई : विदर्भ व लगतच्या भागावर असलेले चक्रिय चक्रवात आता दक्षिण पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या विदर्भावर आहे. कर्नाटक किनाऱ्यापासून मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हवामानातील याच बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी गारपीटीसह अवकाळी पावसाचा मारा होत असून, २४ मार्चपर्यंत असेच वातावरण कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
२१ ते २४ मार्च या कालावधीत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. शिवाय पाऊस पडेल. हवामानात बदल होत असतानाच कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय घट तर मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. कोकण, गोव्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.