लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये भासत असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. शहरांमध्ये ऑक्सिजनची भासत असलेली कमतरता लक्षात घेता मेकिंग द डिफरन्स ही संस्था पुढे सरसावली आहे. कनेक्ट ऑक्सिजन या मोहिमेअंतर्गत या संस्थेच्या वतीने मुंबईत विविध परिसरांमध्ये एकूण २० मोफत ऑक्सिजन केंद्रांचे सोमवारी अनावरण करण्यात आले. मुंबईत ठिकठिकाणी उघडण्यात आलेल्या या ऑक्सिजन केंद्रांमधून गरजू रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पुरविण्यात येणार आहेत. या कार्यात या संस्थेसोबत डोनेटकार्ट, माय ग्रीन सोसायटी, आर एस एस जनकल्याण समिती, आय डी एफ व एन एस एस यांचादेखील मोलाचा हातभार लागला आहे.
या उपक्रमाबद्दल मेकिंग द डिफरन्स संस्थेचे संस्थापक दीपक विश्वकर्मा यांनी सांगितले की, सुरुवातीला मुंबईतील नागरिकांसाठी ही मोफत सेवा सुरू केली आहे. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात १०० हून अधिक मोफत ऑक्सिजन केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ज्या गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे त्यांनी www.mtdngo.org या संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.