मुंबई - स्वातंत्र्य संग्राम सेनानी, द्रष्टे नेते, लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, कर्मयोगी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोरील अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या निधनानिमित्त जाहीर झालेल्या राष्ट्रीय दुखवट्यामुळे स्थगित करण्यात आला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजजवळील स्वतंत्रतासेनानी जवाहरलाल दर्डा चौकात मंगळवारी अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार होते.
पुतळा अनावरण समारंभपूर्वक ज्यांच्या हस्ते होणार होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समारंभाचे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रो. डॉ. अशोक उईके, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, सह पोलिस आयुक्त वाहतूक अनिल कुंभारे, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, आदी मान्यवर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोरील समारंभस्थळी सकाळी ११ च्या सुमारास उपस्थित झाले होते.
मात्र, पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे ही बाब लक्षात घेता पुतळा अनावरणाचा होणारा समारंभ स्थगित करण्यात येत असल्याची भूमिका लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी यावेळी मांडली. आपण सगळेच सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत. पोप फ्रान्सिस यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनानिमित्त केंद्र सरकारने देशभर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असल्याने आजचा पुतळा अनावरणाचा समारंभ आम्ही स्थगित करत आहोत, असे सांगून डॉ. विजय दर्डा यांनी, सर्व मान्यवरांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी, पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन सर्वांना केले. त्यानुसार सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली