अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समितीकडे आलेला १५० कोटी रुपयांपैकी ३३ कोटी रुपयांचा निधी सामंजस्याने विकासकामांसाठी खर्च करण्याबाबतचा अलिखित करार विविध राजकीय पक्षांनी मान्य केल्याचे चित्र बैठकीत उमटले होते. त्यामुळे आजची जिल्हा नियोजन समितीची सभा कोणत्याही खडाजंगीशिवाय शांततेत पार पडली.नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी विकासकामांचा आढावा घेतला. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी १५० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून त्याबाबतचा निधीही उपलब्ध झाला आहे. १५० कोटी रुपयांपैकी ११७ कोटी रुपये सरकारी योजनांसाठी असून उर्वरित ३३ कोटी रुपयांचा निधी सामंजस्याने विकासकामांसाठी खर्च करण्याचा अलिखित करार आधीच झाला आहे. त्यामुळे या ३३ कोटी रुपयांबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.३३ कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी सामंजस्याने वाटप करुन घेण्यात येणार असला तरी भाजपा सत्ताधारी असल्याने त्यांच्या पारड्यात इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत जादा वाटा पडणार आहे, यात काही शंका असण्याचे कारण नाही.बैठकीला आमदार सुनील तटकरे गैरहजर होते. मात्र त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुभाष पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार मनोहर भोईर, आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्यासह अन्य सदस्य, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.दिवसभरातील बैठकांचे सत्र सुरुच राहणार असल्याने बैठका कशा घेणार, किती वेळ घेणार असा सवाल आमदार अनिल तटकरे यांनी उपस्थित केला. त्यावर तुम्हीच सांगा बैठका कशा घ्यायच्या असा प्रतिसवाल पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तटकरे यांना केला. त्यानंतर सभागृह एकदम शांत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकांनी सभागृहात थांबू नये अशी सक्त सूचना मेहता यांनी केली. मस्टरवर हजेरी घेणाऱ्या कर्मचाऱ्याचीही त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन बैठका झाल्या नसल्याने त्याचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यातच सभागृहाचा वेळ गेला. त्यामुळे बैठक बराच काळ लांबली. सकाळी ११ वाजता होणारी बैठक काही अपरिहार्य कारणामुळे दुपारी १२ वाजता सुरु झाली आणि सायंकाळी साडेपाच वाजता संपली. (प्रतिनिधी)