लखनौ/मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. त्यामुळे ४१ ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला किती मतदान झालं? याची उत्सुकता सगळ्यांना आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेला अपयश आलं आहे. विशेष म्हणजे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी सभा घेऊनही फारसा परिणाम दिसून आला नाही.
यूपी, गोवासारख्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी प्रचार केले. उत्तर प्रदेशात संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांनीही प्रदेशात जाऊन प्रचार केला. मात्र, शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांना पराभवाचा फटका बसला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक मतदारसंघात शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाल्याचं दिसून आलं. याठिकाणी नागरिकांनी शिवसेनेला नाकारलं आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार सायंकाळी 6.05 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या आकडेवारीनुसार लखनौ मध्यमधील शिवसेना उमेदवार गौरव वर्मा यांना 125 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे मेहरोत्रा हे विजयी झाले असून त्यांना 98605 मतं मिळाली आहेत. तर, भाजप नेते रजनीश कुमार गुप्ता हे 83,855 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
१९९१ पासून शिवसेना यूपीत निवडणूक लढतेय, पण...
आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिमी यूपीतील काही जिल्ह्यात प्रचार दौरे केले होते. धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेने सुरुवातीपासून यूपी निवडणुकीत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याबाबतही शिवसेनेची चर्चा झाली. परंतु त्यानंतर शिवसेना स्वबळावर निवडणुकीत उभी राहिली. १९९१ पासून शिवसेना उत्तर प्रदेशात निवडणूक लढतेय. केवळ एकदा पवनकुमार पांडेय हे आमदार म्हणून निवडून आले. यूपीत स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. २०१९ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात राम मंदिरात दर्शन घेतले होते. तेव्हापासून यूपीत शिवसेनेने वातावरण निर्मिती केली होती.