Join us

यूपी, बंगाली चिमुरड्यांच्या पिळवणुकीला चाप, आठ महिन्यांत ७२ मुलांची मुंबई पोलिसांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 6:24 AM

गेल्या वर्षभरात बाल कामगार ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी २१ गुन्हे नोंद करत ३८ बाल कामगारांची सुटका केली.

मुंबई : खेळण्याबागडण्याच्या वयात मुंबईतील विविध कारखान्यांत कष्टाची कामे करणाऱ्या ७२ मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यातील बहुतांश अल्पवयीन मुले उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांतील तसेच नेपाळमधील आहेत. 

गेल्या वर्षभरात बाल कामगार ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी २१ गुन्हे नोंद करत ३८ बाल कामगारांची सुटका केली. यावर्षी पहिल्या  ७२ बाल कामगारांची सुटका केली आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २३ बाल मजुरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. अंमलबजावणी कक्षाचे पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

कुलाबा, पायधुनी, धारावी, नागपाडा, शिवाजी नगर, मालवणी, ओशिवरा, भांडुप सोनापूरसह विविध  कारखान्यांत तसेच हॉटेलांतही मुले काम करतात. काही ठिकाणी १२ - १२ तास तर काही ठिकाणी १२ तासांहून अधिक वेळ मुलांकडून कामे करून घेतली जातात. 

नागपाड्यातून ८ बाल कामगारांची सुटकानागपाडा येथील मदनपुरा भागातील दोन कारखान्यात छापा कारवाई करत, बॅग फॅक्टरी मॅनेजर हसमतुल्लाह अब्दुल माजिद मन्सुरी (२०), अब्दुल रेहमान शेख (२५) यांना अटक केली आहे. मुले बॅग शिवण्याचे काम करत होते. ८ मुलांची सुटका केली. त्यांच्याकडून १० ते १२ तास काम करून घेण्यात येत होते. ज्वेलरी कारखाना, बॅग बनविणे, प्लास्टिकसह विविध कारखान्यांत आजही बाल कामगार काम करत आहे. अनेक प्रकरणात घराच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आई-वडिलांना मदत म्हणून ही मुले मेहनतीचे काम करताना दिसतात. तर, काही मुलांना बळजबरीने तसेच मुंबई फिरण्यासाठी तसेच चांगले शिक्षण, पैसे देण्याच्या नावाखाली जुंपले जात आहे.  उत्तरप्रदेश, बिहार मधील मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना योग्य मोबदला न देता त्यांचा छळ केला जात आहे.सात वर्षाच्या मुलाचाही समावेशमाझगाव येथील कारवाईत बॅग फॅक्टरीतून १३ मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना बिहार येथून आणण्यात आले होते. यामध्ये एक ७ वर्षाचा मुलगाही पोलिसांच्या हाती लागला. कारखाना मालक गौस मोहम्मद फराज मेहबूब अन्सारी (२६) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

टॅग्स :मुंबई