Join us

मिलन सबवेच्या टाकीत ६ तासांपर्यंतचा साठा; उपसा करण्यासाठी अतिरिक्त पंप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:58 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मिलन सबवेत पावसाचे पाणी साचू नये यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून भूमिगत पाणी साठवण ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मिलन सबवेत पावसाचे पाणी साचू नये यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून भूमिगत पाणी साठवण टाकी बांधली आहे. सुमारे तीन कोटी लीटर क्षमतेच्या या टाकीचा पूर्ण क्षमतेने उपयोग व्हावा म्हणून या ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत. ही टाकी संपूर्ण भरण्यासाठी दोन पंप व सोबत एक जलवाहिनी तर टाकीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त एक पंप अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल सहा तासांपर्यंतचा पाणीसाठा या भूमिगत टाकीमध्ये करून नागरिकांना दिलासा देणे शक्य होणार आहे.

अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या परिसरांमध्ये पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांच्या ठिकाणी क्षमतावाढीसाठी उपाययोजना केल्या जात असून, त्यापैकी मिलन सबवे भूमिगत पाणी साठवण टाकी हाही एक प्रकल्प आहे. मिलन सबवे हा एच पूर्व आणि के पूर्व विभागांचा सीमेचा भाग आहे. मिलन सबवे हा अत्यंत सखल भाग असल्याने दरवर्षी जोरदार पावसात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र, पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ही समस्या लक्षात घेऊन भूमिगत पाणी साठवण टाकीची उभारणी केल्याची माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.

पंपाची कार्यवाही काय असणार? n मिलन सबवे पाणी साठवणूक टाकीचे दोन पंप सबवेच्या ठिकाणी पाणी उपसा करून टाकी पूर्ण क्षमतेने भरेल, अशा नियोजनाने लावण्यात येतील. तर समुद्राला ओहोटी असताना, टाकीतील पाण्याचा उपसा करता यावा यासाठी अतिरिक्त एक पंप बसविण्यात येणार आहे. n हे उपसा केलेले  पाणी इर्ला नाला येथे सोडण्यात येईल. या संपूर्ण व्यवस्थेमुळे जोरदार पावसाप्रसंगी सखल भागामध्ये पाणी साचण्यापासून दिलासा मिळतानाच दुसरीकडे टाकीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांचा वापर होईल, असे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता विभास आचरेकर यांनी सांगितले.

दोन पंप लावणारअतिरिक्त १५ टक्के क्षमता उपयोगात येण्यासाठी या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि दोन पाणी उपसा करणारे ३००० क्युबिक मीटर क्षमतेचे पंप लावण्याचा निर्णय.

टॅग्स :मुंबई