Join us

१०० महाविद्यालयात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र, बुधवारी उद्घाटन सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 6:51 PM

महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.

२०२४-२५ सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यानुसार १३ मार्च २०२४ रोजी राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. सदर कौशल्य विकास केंद्रांचा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी ११ वाजता पार पडेल. 

महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापनेसाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. "पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळायला हवे. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवकांना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील. या मार्फत राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल. बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमांची निर्मिती देखील केली जाईल. पहिल्या टप्प्यात १०० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु होत असून, याचा अतिशय आनंद आहे. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु करण्याचे ध्येय आम्ही पूर्ण करू" असे लोढा यांनी सांगितले. 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० अंतर्गत जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून महाविद्यालयामध्ये सदर कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. युवक युवतींना रोजगारासाठी, त्यांच्या करिअरसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या माध्यमातून प्रदान करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईमंगलप्रभात लोढाएकनाथ शिंदेअजित पवारदेवेंद्र फडणवीस