Join us

कांजूरमार्गला अद्ययावत महिला-बाल रुग्णालय, विविध मोफत सेवा होणार उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 2:24 PM

यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुंबई : विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसरातील महिला व बालकांसाठी स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणाऱ्या या अद्ययावत रुग्णालयाच्या रूपाने एस. विभागातील नागरिकांना विविध मोफत वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात पालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधेसाठी २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांच्या ठिकाणी मोफत आणि कॅशलेस असे वैद्यकीय उपचार देण्यासाठी झीरो प्रिस्क्रिप्शन धोरण राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे वैद्यकीय सुविधेत रुग्णांना औषधींची खरेदी करण्याची गरज भासणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

कसे असणार स्पेशालिटी रुग्णालय?-  विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसरातील नागरिकांकडून या रुग्णालयाची मागणी होत होती. -  गर्भवती स्त्रियांना प्रसूतीसाठी अद्ययावत सुविधांबरोबरच बालकांसाठीही येथे ओपीडीच्या माध्यमातून उपचार उपलब्ध होतील. -  स्पेशालिटी रुग्णालयाअंतर्गत नवजात बालकांसाठी सुविधा मिळणार आहे. हे रुग्णालय ९० बेड क्षमतेचे असून, त्याचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण केले जाईल. आयव्हीएफ प्रयोगशाळा, निदान विभाग, ओपीडी, शस्त्रक्रियागृह, प्रसूती विभाग, बाल / शिशुचिकित्सा विभाग, शस्त्रक्रिया पूर्व निरीक्षणालय विभाग, शस्त्रक्रियापश्चात निरीक्षणालय, प्रतीक्षालय असे विभाग इमारतीत असतील. 

टॅग्स :हॉस्पिटल