मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच त्यांच्याकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र ''मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही'', असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांनी एकत्र येऊन युपीएला बळकटी देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. तर, भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा युपीएला फायदा होईल, असे म्हटले आहे.
शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, शरद पवार यांनी स्वत: हे वृत्त फेटाळले असून यात तथ्य नसल्याचं म्हटलंय. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नसल्याचं पंकजा यांनी म्हटलंय. पंकजा यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना हे आपलं मत व्यक्त केलं.
शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीएचे अध्यक्ष झाले तरी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप मजबूत आहे, मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा युपीएला निश्चितच फायदा होईल. पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा ते युपीएला फायदा करुन देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण, भाजपाला काहीही फरक पडणार नाही, असे पंकजा यांनी म्हटलंय.
संजय राऊत म्हणतात
यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल", असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा राऊत यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांनी या बातमीत तथ्य नसल्याचं सांगितल्याचं मी ऐकलंय. पण, जर अधिकृतपणे यासंदर्भात प्रस्ताव आला तर आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहिल. सध्या राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस कमकुवत आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन युपीएला ताकद देण्याची गरज असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
सध्या सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्षा
भाजपाविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत होते. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा होती. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचे सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे.