मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात इच्छुकांनी मतदारसंघात उभे राहण्यासाठी आपापला पर्याय शोधणे सुरू केले आहे. अलीकडच्या काळात प्रत्येक पक्षात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडतोय. तसाच मनसेतही प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिला आहे.
शिवसेना भिवंडी लोकसभा उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांनी त्यांच्या समर्थक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ निवासस्थानी पार पडला. या पक्षप्रवेशाला मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव आणि पक्षाचे उपाध्यक्ष डी.के म्हात्रे हे उपस्थित होते. मागील काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पक्ष बैठका घेत निवडणुकीचा आढावा घेत आहेत. त्यात मनसे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे.
गेल्यावेळी मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता केवळ प्रचार केला होता. मात्र यंदा राज ठाकरे लोकसभेला मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पक्षातील पदाधिकारी, नेत्यांसोबत चर्चा, बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मनसेला मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे वगळता इतर ठिकाणी फारसे यश आल्याचे दिसत नाही. परंतु २०१९ नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची राज ठाकरे यांची जवळीक अनेकांच्या भूवया उंचावणारी आहे.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध चांगले आहेत. अनेकदा हे दोन्ही एकमेकांना भेटत असतात. त्यात मनसे-शिवसेना युती होणार अशाही बातम्या येतात. ठाणे जिल्ह्यात मनसे मानणारा मोठा वर्ग आहे. पक्षाचा एकमेव आमदारही ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेला आहे. मनसेला गेल्या निवडणुकीत भिवंडी, ठाणे याठिकाणी लाखोंनी मते पडली होती. त्यातच आता भिवंडी येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत असल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.