आगामी निवडणुका २५ वर्षांचे भवितव्य ठरवतील - शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:34 PM2024-03-07T12:34:35+5:302024-03-07T12:34:57+5:30
ही निवडणूक लोकशाही आणि सुरक्षिततेची खातरजमा करण्याचा उत्सव आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
मुंबई : भारतातील येत्या निवडणुका आगामी २५ वर्षांचे भविष्य ठरवतील. गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्या आधारावर २०४७ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारत कुठे असेल, हे पुढील ५ वर्षांत निश्चित केले जाईल. ही निवडणूक लोकशाही आणि सुरक्षिततेची खातरजमा करण्याचा उत्सव आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
आयजीएफ वार्षिक गुंतवणूक शिखर परिषद - एनएक्सटी १० मध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाह म्हणाले, येत्या ५ वर्षांत आम्ही संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देऊ. वर्ष २०२७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्ससह जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणे, २०३० पर्यंत २ ट्रिलियन डॉलर्सची निर्यात, २०२५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणे, २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी ठेवले आहे.