आधार अपडेट करा, अन्यथा अनुदान विसरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 12:00 PM2023-04-06T12:00:52+5:302023-04-06T12:01:08+5:30
शिक्षक, मुख्याध्यापकांना करावा लागतोय तांत्रिक अडचणींचा सामना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. या कालावधीत आधार अपडेट न झाल्यास अनुदान मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, आधार अपडेट करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आधारसाठी वेतन थांबवू नये, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे.
राज्य सरकारतर्फे २०, ४०, ६० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. नव्याने २० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वेतनासाठी विद्यार्थी आधार अपडेटची अट घातली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले नाही तर वेतन अनुदान थांबविले जाईल अशी शिक्षण विभागाने भूमिका घेतली.
मात्र, त्यावर शिक्षक आमदारांनी व शिक्षक, मुख्याध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षण आयुक्त व प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांबरोबर याबाबत चर्चा केली. त्यात आधार अपडेट करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण न झाल्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर त्यावर शिक्षण विभागाने सकारात्मक भूमिका दाखविली असल्याची माहिती शिक्षक, मुख्याध्यापकांकडून देण्यात येत आहे.
दरम्यान, तांत्रिक अडचण दूर करावी अशी मागणी शिक्षकांकडून सातत्याने केली जात असूनही त्यात फरक पडलेला नाही.
२०२२-२३ च्या संचमान्यतेत मंजूर कर्मचाऱ्यांची कागदपत्र तपासणी पूर्ण
शिक्षण विभागाच्यावतीने २०२२-२३ च्या संचमान्यतेत मंजूर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी मात्र पूर्ण झाली आहे. या तपासणीनंतरची प्रक्रियाही वेळेत पूर्णत्वास आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संबंधित शाळांना सूचना
मुलांचे आधार अपडेट करण्याच्या सूचना संबंधित शाळा आणि तिथल्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. शाळांनी वेळेवर आधार अपडेटचे काम केले तर त्यांना सरकारी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हे सादर करावे लागणार आहे.
वेतन थांबविणे चुकीचे
अनेक वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना टप्पा अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे, अशा परिस्थितीत आधार अपडेट झाले नाही म्हणून त्यांचे वेतन थांबविणे चुकीचे आहे. तसेच संबंधित शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे योग्य नाही.
३० एप्रिलची डेडलाईन
राज्य सरकारच्यावतीने अंशतः अनुदानित शाळांना अनुदान दिले जाते. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे आधार अपडेट बाकी
जिल्ह्यातील शाळांमधील मुलांचे आधार अपडेट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकारचे अनुदान रद्द होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.