Join us

गरजू विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका

By admin | Published: April 18, 2017 6:02 AM

अभ्यास गल्ली ही मुंबईची एक वेगळी ओळख आहे. दादरमध्ये आजही अभ्यास गल्ली नियमित भरते,

मुंबई : अभ्यास गल्ली ही मुंबईची एक वेगळी ओळख आहे. दादरमध्ये आजही अभ्यास गल्ली नियमित भरते, तर मंत्रालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मोकळ्या हॉलमध्ये विद्यार्थी रात्रभर अभ्यास करत बसलेले असतात. मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी भांडुपमध्ये अशीच एक अद्ययावत अभ्यासिका उभारून झोपडपट्टीतील अनेक विद्यार्थ्यांची सोय केली आहे.भांडुप पश्चिम भागातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शालान्त व महाविद्यालयीन परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी निवांत अशी जागा नव्हती. ही अडचण पाहून शिंदे यांनी ‘गृहपाठ’ नावाने कॉर्पोरेट एसी रीडिंग रूम उभारली आहे. या ठिकाणी मुलामुलींसाठी दोन स्वतंत्र प्रसाधनगृहे, पादत्राणे ठेवण्यासाठीची वेगळी व्यवस्था, प्रत्येकाची अभ्यासासाठी बसण्याची वेगळी सोय, आणि सीसीटीव्ही कॅमेरे या ‘गृहपाठ’ रीडिंग रूममध्ये आहेत. शिवाय, विनामूल्य असल्याने १०० विद्यार्थी या ‘गृहपाठा’चा लाभ घेत आहेत.माझ्या मतदारसंघात जेवढी जागा मिळू शकत होती त्या जागेत मी हा प्रयत्न केला आहे. आपल्याला लोक ‘वानखेडे’फेम, ‘धारा’फेम अशी विशेषणे लावत असली तरी मला मुलांसाठी आणखी मोठे अभ्यास केंद्र उभे करायचे आहे. आपल्या मतदारसंघात आपण एकही लेडिज बार होऊ दिलेला नाही, त्याऐवजी अशा उपक्रमासाठी लोकांनी आपणहून पुढाकार घेऊन जागा द्यायला हव्यात, असे शिंदे यांनी सांगितले.याआधी आपण पिंपळ, बदाम, वड अशी अनेक झाडे मोठ्या प्रमाणावर लावली होती. तसेच आणखी काही वेगळी झाडे बाळासाहेब ठाकरे म्युझिकल जॉगिंग ट्रॅकच्या भोवती लावण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)