विश्वकोश अद्ययावत करणार
By admin | Published: April 2, 2016 02:13 AM2016-04-02T02:13:48+5:302016-04-02T02:13:48+5:30
जगातील विविध विषयांतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी मराठी विश्वकोश मंडळ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे
मुंबई : जगातील विविध विषयांतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी मराठी विश्वकोश मंडळ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, दिलीप करंबेळकर, अध्यक्ष : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सुवर्णा पवार, सचिव : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, डॉ. बाळ फोंडके,डॉ. नीरज हातेकर आणि प्रा. गौरी माहुलीकर हे उपस्थित होते.
या करारान्वये मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी मुंबई विद्यापीठात १० ज्ञानमंडळे स्थापन करण्यात येणार आहेत. यात अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित व सांख्यिकी, वनस्पतिशास्त्र, जैवविविधता, जीवशास्त्र, भौतिकी, आधुनिक तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञ आदी विषयांचा समावेश आहे. या विषयांसाठी ज्ञानमंडळ म्हणून मुंबई विद्यापीठ जबाबदारी पार पाडेल.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ध्येय-धोरणानुसार विविध विद्यापीठांना ज्ञानमंडळाद्वारे सहभागी करून घेण्याकरिता विविध विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० खंडांच्या नोंदींचे अद्ययावतीकरण करणे, विविध विषयांवरील नव्या माहितीची सातत्याने भर टाकणे यासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करून प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन करून ही सर्व ज्ञानमंडळे एकमेकांशी जोडून त्या आधारावर विश्वकोशाची रचना करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
ज्ञानमंडळाच्या रचनेमध्ये पाच तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ व एक समन्वयक यांचा समावेश असेल. हे ज्ञानमंडळ महाराष्ट्रातील त्या विषयासंबंधातील लेखकांचा शोध त्यांच्या मदतीने नोंदींच्या लिखाणाचे व अद्ययावतीकरणाचे काम करेल. ही सर्व माहिती विश्वकोश मंडळाच्या संकेतस्थळावर वाचकांना उपलब्ध होईल. याद्वारे विविध विषयांवरील तज्ज्ञांची एक साखळी निर्माण होऊन तिच्याद्वारे सर्व विषयांवरचे जागतिक ज्ञान मराठी भाषेत आणण्याची प्रक्रिया निरंतरपणे चालेल अशी अपेक्षा आहे. विश्वकोश मंडळातील विविध सदस्य त्यांच्याशी निगडित असलेल्या विषयांच्या ज्ञानमंडळाचे पालक म्हणून काम करतील. विश्वकोशाचा हा उपक्रम यशस्वी होणार असल्याचा आशावाद कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
सर्व ज्ञानमंडळे विश्वकोशाशी जोडणार
मराठी विश्वकोश खंड १ ते २०मधील नोंदींच्या अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कालबाह्य झालेल्या नोंदी निश्चित करणे, विद्यमान नोंदींचे पुनर्लेखन, नव्या नोंदी लिहून घेणे आदी विविध विषयांचा समावेश असेल
प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळाची निर्मिती करून ही सर्व ज्ञानमंडळे विश्वकोशाशी जोडली जाणार आहेत.