नगराध्यक्षांचे अधिकार वाढविल्यानंतर आता महापौरांचेही अधिकार वाढविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:35 AM2018-01-11T02:35:07+5:302018-01-11T02:35:16+5:30
नगराध्यक्षांचे अधिकार वाढविल्यानंतर आता महापौरांचे अधिकार वाढविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुंबई : नगराध्यक्षांचे अधिकार वाढविल्यानंतर आता महापौरांचे अधिकार वाढविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौरांचे अधिकार वाढविण्याची मागणी केली. महापौरपद केवळ नामधारी असल्याची भावना असून लोकप्रतिनिधी असूनही त्यांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार नाहीत. सर्वाधिकार आयुक्तांना असल्याचे चित्र आहे याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. त्यावर, या संबंधी अहवाल सादर करण्यास मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना सांगितले.
राज्यातील बहुतेक महापालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. अशावेळी महापौरांना जादा वित्तीय व प्रशासकीय अधिकार देण्यासंबंधीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.
खुल्या जागेवरील कर कमी करण्याचे निर्देश
कल्याण-डोंबिवली महापालिकेत खुल्या जागेवरील कर राज्यात सर्वाधिक आहे याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले.
त्यावर, हे दर कमी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.