Join us

अप्पर, मध्य वैतरणा धरणे भरली; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 4:37 AM

भातसाचेही दरवाजे उघडण्याच्या मार्गावर

ठाणे/मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा व मध्य वैतरणा ही दोन्ही धरणे सोमवारी भरली. यामुळे अप्पर वैतरणाचे पाच दरवाजे तर मध्य वैतरणाचे दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले. या पाठोपाठ भातसा धरण भरण्याच्या स्थितीत आहे. यात ८०.६३ टक्के पाणीसाठा तयार झाला. आषाढी एकादशीचे मुहूर्त शोधून सोमवारी भातसातील पाण्याचे गंगापूजन करण्यात आले. यासाठी एक दरवाजा थोडा वेळ उघडून तो पुन्हा बंद करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास रात्री कोणत्याही क्षणी त्याचे दरवाजे उघडण्याची तयारी करण्यात आली आहे. मोडकसागर, तानसा सुमारे एक आठवड्यापूर्वीच भरले. त्यानंतर, बारवी धरण आणि आता अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा भरले आहेत. अप्पर वैतरणातून आठ हजार ६९० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाची पाणीपातळी ६०३.५० मीटर आहे. याप्रमाणेच, मध्य वैतरणाची पातळी २८५ मीटर असल्याची नोंद करण्यात आली. या धरणाचे दरवाजे ५० सेंटीमीटर उघडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या दोन्ही धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या धरणाखाली वैतरणा नदीच्या पात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.भातसा नदीच्या पाण्याचे विधिवत पूजनभातसानगर : गंगा पूजनसाठी भातसा धरणाचा एक दरवाजा सकाळी पंधरा सेंमी उघडण्यात आला. त्यानंतर, तो पुन्हा बंद केलेला आहे. भातसा नदीच्या या पाण्याचे गंगा पूजन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यकारी अभियंता वाय. बी. देसाई, ग्रामपंचायतीचे सरपंच बाळ वेहळे, उपसरपंच प्रकाश भेरे, चंदर सासे आदींच्या उपस्थितीत गंगा पूजन करण्यात आले.भातसा धरणाच्या पाण्याची पातळी १३४ मी. पेक्षा अधिक वाढली की, गंगा पूजन करून नदीच्या पाण्याला वाट करून देण्याची प्रथा आहे. या वेळी साडी चोळी विधिवतपणे अर्पण करण्याच्या प्रथेप्रमाणे हा गंगा पूजेचा कार्यक्रम उकरण्यात आला. या वेळी पाच दरवाज्यांपैकी एक दरवाजा पंधरा सेंमीने उघडून भातसा नदीच्या पाण्यास वाट मोकळी करून दिली. त्यांची विधिवत पूजा करून, तो पुन्हा बंद केल्याचे भातसा धरण प्रशासनाने स्पष्ट केले.भातसा धरणातही सोमवारी सायंकाळपर्यंत ७९३.६१२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. १३५.०१ पाण्याची पातळी तयार झालेल्या भातसा धरणात सोमवारी ८०.६३ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १,५५६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. आजमितीस धरणात पावसाचा जोर कमी आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २८ मिमी पाऊस पडला. त्यानंतर, संध्याकाळपर्यंत केवळ १६ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे रात्रभरात किंवा मंगळवारी सकाळी उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ७८ टक्के पाणीसाठा तयार झाल्यानंतर दरवाजे उघडे करणे शक्य होते. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. यामुळे ८० टक्के भरल्यानंतरही ते उघडणे शक्य झाले नाही.तलावांमध्ये ८० टक्के जलसाठामुंबई : तलाव क्षेत्रांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारपर्यंत ११ लाख ८० हजार ३१४ दक्षलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला ३०२ दिवस पुरेल इतका हा जलसाठा आहे. मान्सून आणखी दोन महिने कायम असल्याने, उर्वरित २० टक्के जलसाठाही तलावांमध्ये जमा होण्याची आशा आहे.मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून दररोज ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी १५० दशलक्ष लीटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. १ आॅक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे उर्वरित तलावही लवकरच भरतील, असा विश्वास जल अभियंता खात्याकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :धरणपाणीमुंबई