Join us

भिडेंच्या वक्तव्यावर विधानसभेत गदारोळ; सरकार उचित कार्यवाही करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 8:48 AM

शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी काढलेल्या अनुद्गारावरून विधानसभेत शुक्रवारी गदारोळ झाला.

मुंबई : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी काढलेल्या अनुद्गारावरून विधानसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेसचे आमदार काही काळ आक्रमक झाले.

चव्हाण यांनी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना भिडे यांच्या विधानांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये भिडे सातत्याने करीत असतात. वादग्रस्त विधाने करून तणाव पसरविणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आळा बसविणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर अशा प्रवृत्ती बोकाळतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

यावर सरकारने गंभीर दखल घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. मात्र, त्यामुळे समाधान न झालेले चव्हाण व इतर काँग्रेस सदस्य आक्रमक झाले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची अध्यक्षांच्या निर्देशांनुसार सरकारने गंभीर दखल घेतली आहे, तपासून उचित कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

टॅग्स :संभाजी भिडे गुरुजीविधान भवन