‘वंदे मातरम्’वरून विधानसभेत गदारोळ; फडणवीसांनी आझमींना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:58 AM2023-07-20T09:58:53+5:302023-07-20T09:59:14+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आझमींना सुनावले खडे बोल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांंनी ‘वंदे मातरम्’संदर्भात केलेल्या विधानावरून बुधवारी विधानसभेत एकच गदारोळ झाला. सत्तारूढ आमदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा सभागृह सुरू झाले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझमी यांना खडे बोल सुनावले अन् कामकाज सुरळीत झाले.
‘वंदे मातरम्’ हे देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. संविधानानेच ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगानाचा दर्जा दिला आहे. जगातील कोणताच धर्म आपल्या मातेला प्रणाम करण्यापासून रोखत नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आझमी यांना सुनावले. त्यानंतर कोणतेही वादग्रस्त विधान न करता आझमी हे लक्षवेधी सूचनेवर पुन्हा बोलू लागले व वातावरण निवळले.
औरंगाबादच्या ‘त्या’ घटनेत निरपराधांवर कारवाई नाहीच
रोशन गेट, औरंगाबाद येथे २९ मार्च २०२३ रोजी झालेल्या तणावाच्या घटनेत पोलिसांनी निरपराधांवर कारवाई केली नाही. त्यावेळी ज्या व्यक्तीचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाला तीदेखील जमावामध्ये होती, असे फडणवीस यांनी सांगितले. आझमी यांनी या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडताना आपल्या घराच्या आवारात उभ्या असलेल्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाल्याचा दावा केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, आझमी यांच्या माहितीमध्ये सत्य नाही. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या जमावातील लोकांवरच कारवाई केली. सगळ्या गोष्टींचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध आहे.