मुंबई : येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) पुन्हा एकदा शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद उफाळला आहे. वसतिगृहाच्या कॅन्टिनमध्ये मांसाहार केल्याने एका विद्यार्थ्यास अपमानित करण्यात आल्याच्या आरोपावरून तसेच कॅन्टिनमध्ये लावलेल्या पोस्टरमुळे हा वाद निर्माण झाल्याचे समजते. यासंदर्भातील ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
आयआयटीच्या वसतिगृह १२च्या कॅन्टिनमध्ये ‘येथे फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी आहे’, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल या विद्यार्थी संघटनेने यासंदर्भात ट्विट केले आहे. या पोस्टरवरून गेल्या आठवड्यात आयआयटी परिसरात वाद निर्माण झाला असून, हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यासंदर्भात आयआयटी प्रशासनाने मात्र कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. तीन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या आरटीआयमधून आयआयटीमध्ये आहारासंदर्भात ठोस धोरण नसल्याचे उघड झाले होते. यासंदर्भातील कायदा ग्रामीण आणि वंचित पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांशी भेदभाव करणारा असल्याने विद्यार्थ्यांच्या एका गटाने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती.
पाच वर्षांपूर्वी...आयआयटी मुंबईत शाकाहार आणि मांसाहार हा वाद जुना आहे. २०१८ मध्ये वसतिगृहाच्या कॅन्टिनमध्ये अशी घटना उघडकीस आली होती. मांसाहारी विद्यार्थ्यांनी शाकाहाऱ्यांच्या ताटांत ताट मिसळू नये. मांसाहारी विद्यार्थ्यांनी फक्त ट्रे प्लेट वापरावे, अशा आशयाचा ई-मेल खानावळप्रमुखाने सर्व विद्यार्थ्यांना पाठविला होता. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते.