Join us

आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग सुरु असल्याने उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 5:42 PM

३ मेपर्यंत रेल्वे बंद करण्याची घोषणा झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळावर रेल्वे तिकिट बुकिंग सेवा सुरू होती. त्यामुळे प्रवाशांकडून १५ एप्रिलचे तिकीट आरक्षित केले जात होते. मात्र ३ मेपर्यंत रेल्वे बंद करण्याची घोषणा झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. परिणामी, तत्काळ आयआरसीटीसीकडून पुढील घोषणेपर्यंत तिकीट बुकिंग केली जाणार नाही. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर रेल्वे मंत्रालयाने १४ एप्रिलपर्यंत देशभरातील एक्सप्रेस, लोकल, कोलकत्ता मेट्रो बंद करण्याचा निर्णय घेतला. २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन रेल्वे सेवा बंद होती. मात्र या पहिल्या टप्प्यात आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग सुरु होते. त्यामुळे एका ठिकाणी अडकलेले प्रवासी १५ एप्रिलपासूनचे रेल्वे तिकीट बुकिंग करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविला. त्यानंतर रेल्वे सेवा बंद करण्याची कालावधी ३ मेपर्यंत करण्यात आला. मात्र यावेळी आयआरसीटीसीने तिकीट बुकिंग करणे थांबिवले. यासह तत्काळ तिकीट देखील रद्द केले. परिणामी, १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत ३९ लाख रेल्वे तिकीट आरक्षित करण्यात आले होते. मात्र हे सर्व तिकीट रद्द करून तिकिटाचा परतावा देण्यात येणार आहे.

------------------------------

पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन काळात रेल्वे बंद होती. मात्र तिकीट बुकिंग सेवा सुरु होती. कारण यामुळे आयआरसीटीसीच्या सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो. लॉकडाऊन वाढले नसते, तर अचानक सिस्टिमवर ताण आला असता. मात्र आता पुढील घोषणेपर्यंत तिकीट सेवा बंद राहणार आहे. प्रवाशांना तिकिटाचा परतावा देण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी सांगितले.

-----------------------------

टॅग्स :रेल्वेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस