मुंबई : तौक्ते वादळादरम्यान मुंबईमध्ये अनेक झाडे मुळांसकट कोसळून पडण्याच्या अनेक घटना घडल्या. आरेच्या जंगलातही अशा अनेक नोंदी झाल्या. साधारणपणे अशा प्रकारे जर एखादे झाड पडले तर ते कापण्यात येते आणि त्याचे लाकूड विकले जाते; पण या वर्षी रीवायल्डिंग आरे या काही पर्यावरणप्रेमींच्या समूहाने या झाडांना कापण्यापासून रोखले आणि त्यांना पुन्हा त्यांच्या जागी रोवण्याचे कामदेखील केले.सदर समूहातील लोकांनी इतरही अनेक ठिकाणी वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे काम केले आहे. आरेमध्ये २९ मे रोजी त्यांनी एकूण ६ वृक्षांचे प्राण वाचवले आहेत. यात २ पिंपळ, २ सोन मोहर, १ केव्नी, १ चांदवा या झाडांचा समावेश आहे. या कामासाठी त्यांनी जेसीबी, क्रेन आणि इलेक्ट्रिक करवतीचा वापर केला. झाडे पुन्हा मुळे धरतील याची खात्री करण्यासाठी रुटिंग हार्मोन आणि बुरशीनाशकांचा वापर करण्यात आला.समूहाचे सदस्य आणि पर्यावरणप्रेमी ब्रायन यांनी सांगितले की, पडलेले झाड कापणे ही अगदी सोपी गोष्ट असली, तरीही ते झाड जिवंत आहे याची जाणीव ठेवून त्याला जर पुन्हा जगण्याची संधी देणे आपल्याला शक्य असेल तर नक्कीच प्रयत्न करावेत. तर दुसरीकडे विनोद मोहिते हे गेल्या काही काळापासून झाडांचे पुनर्रोपण करण्याचे काम करत आहेत. या कामात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. निसर्गप्रेमी अमित आजगावकर म्हणाले, उन्मळून पडलेल्या झाडांना पुन्हा जीवनदान दिले जात आहे ही अशक्य वाटणारी गोष्ट येथे घडली, हे पाहून मी भारावून गेलो आहे.
‘वृक्षाला जगविण्यासाठी दक्षतेची गरज’ संजीव वलसन ज्यांच्याद्वारे रीवायल्डिंग आरे या उपक्रमांचे आयोजन केले जाते. ते म्हणाले, एक रोप लावणे आणि एका वृक्षाचे पुनर्रोपण करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वृक्षाला जागवण्यासाठी स्थानिकांच्या हातभाराची आणि स्वयंसेवकांच्या दक्षतेची गरज असते. या कार्यासाठी आर्थिक अनुदानाचीही तितकीच गरज आहे. आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी देणगीदारांचे आभार मानतो. तुमच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या केलेल्या मदतीने तुम्ही पर्यावरण जगवत आहात, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे.