Join us

विशेष फेरीत कट ऑफचा चढउतार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीसाठी बुधवारी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, विशेष फेरीच्या गुणवत्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीसाठी बुधवारी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत बहुतांश महाविद्यालयांचे कट ऑफ हे वाढलेले पाहवयास मिळाले आहेत. विशेष फेरीमध्ये काही गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नव्याने अर्ज केल्याने हे कट ऑफ वाढल्याची माहिती महाविद्यालय प्रशासन देत आहे. अनेक महाविद्यालयांचे कट ऑफ हे नेहमीप्रमाणे १ ते २ घसरले असून, काही ठिकाणी ही घसरण थेट ५ ते १० टक्क्यांचीही दिसून आली आहे. महाविद्यालयांचा कट ऑफ घसरला असला तरी तो ८० टक्क्यांच्या वर असल्याने ६० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांचा आग्रह सोडून इतर महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.

सेंट झेविअर्स महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा कट ऑफ हा विशेष फेरीत ४ टक्क्यांनी वाढला आहे. तिसऱ्या फेरीत तो ८९ टक्के होता, तर विशेष फेरीत तो ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. साठ्ये महाविद्यालयाच्या कला आणि विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.

कला शाखेच्या कट ऑफमध्ये ५ टक्क्यांची वाढ असून, तो यावेळी ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये ६ टक्क्यांची वाढ झाली असून, तो ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. वझे केळकर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कट ऑफमध्येही ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मिठीबाई महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या कट ऑफमध्येही किंचित वाढ होऊन तो ९१.८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

बहुतांश महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये काही ठिकाणी २ ते ३ टक्क्यांची तर काही ठिकाणी १० टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचे पहायला मिळाली आहे. ३ फेऱ्यांमध्ये झालेल्या एकूण प्रवेशात मुंबई विभागात प्रवेशाची टक्केवारी आतापर्यंत सगळ्यात कमी आहे, त्यामुळे विशेष फेरीला विद्यार्थी कसा प्रतिसाद देतात आणि किती प्रवेश निश्चित होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी कट ऑफ पाहता नामांकित महाविद्यालयांचा आग्रह प्रवेशासाठी सोडून प्रवेश निश्चिती करावे, असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत.

----------

विशेष फेरीतील नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ

महाविद्यालय - कला - वाणिज्य - विज्ञान

एचआर - ८० - ८८ - ६९. ८

केसी - ६०- ८६.६ - ५८.६६

झेविअर्स - ० - ० - ९२. ४

रुईया - ७९. ८ - ०- ८३. ४

पोदार - ०- ८२. ८ - ०

रुपारेल - ५६.२- ८३.८ - ८०.६

डहाणूकर - ०- ७९- ०

साठ्ये - ८३.४ - ७९.८ - ९४

मिठीबाई - ८८- - ९१.८- ७७

एनएम - ० - ० - ०

एमसीसी - ०- ९१. ६- ०

सीएचएम - ४७.८ - ७८.२ - ७३.८