यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:46 PM2019-05-10T13:46:52+5:302019-05-10T13:48:55+5:30
राज्याचे मावळते मुख्य सचिव असलेले यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई - राज्याचे मावळते मुख्य सचिव असलेले यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यू.पी.एस मदान यांचा मुख्य सचिवपदाचा दर्जा मिळणार आहे. मदान यांची नियुक्ती या वर्षीच्या मार्च महिन्यात राज्याच्या मुख्य सचिवपदी करण्यात आली होती. मदान हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्य सचिवपदाच्या आधी त्यांच्याकडे राज्यातील वित्त विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी होती. येत्या ऑक्टोबरमध्ये यू.पी.एस मदान निवृत्त होणार आहेत.
यू.पी.एस मदान यांच्या जागी राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती झाल्याने मुंबई महापालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
BMC commissioner Ajoy Mehta to be the new Chief Secretary of Maharashtra. Present Chief Secretary UPS Madan will be special Advisor (Chief Secretary grade) to Chief Minister Devendra Fadnavis now. (File pic of Ajoy Mehta) pic.twitter.com/1ufrdErOOq
— ANI (@ANI) May 10, 2019
अजोय मेहता यांनी 2015 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. तब्बल 4 वर्ष त्यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळली. 27 एप्रिल 2019 रोजी अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची 4 वर्ष पूर्ण केली. मुंबई महापालिकेच्या कारभारात सर्वाधिक काळ पदभार स्वीकारणारे अजोय मेहता हे पहिले आयुक्त आहे. यापूर्वी सदाशिव तिनईकर यांनी 1986 ते 1990 मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यांनी 3 वर्षे 9 महिने आणि 8 दिवस इतका कालावधी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर पूर्ण केला होता. अजोय मेहता यांनी सदाशिव तिनईकरांनंतर हा मान पटकावला. अजोय मेहता यांनी महापालिकेच्या कारभारात शिस्त आणली. त्यांच्या कडक शिस्तीने महापालिकेचा कारभार सुधारल्याचं बोललं जातं. तसेच शिवसेनेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजोय मेहता यांचा महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली होती असा आरोप नेहमी केला जातो.