मुंबई - राज्याचे वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव उरविंदर पाल सिंग मदान यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या मंजूरीनंतर मदान यांची नियमित नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली. तत्कालीन मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची लोकपाल मंडळात सदस्यपदी नियुक्ती झाल्याने काल त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान, वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा अतिरीक्त कार्यभार मदान यांच्याकडे देण्यात आला आहे.
सकाळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मदान यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजीव निवतकर यांनी मदान यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, मुख्य सचिव कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
भारतीय प्रशासन सेवेच्या 1983 च्या तुकडीचे असलेल्या यू. पी. एस. मदान यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. मे 2018 पासून ते वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. मदान हे मूळचे पंजाब राज्यातील चंदीगढ येथील आहेत. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1959 मध्ये झाला. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मदान यांचे वडील बॅंकेत नोकरीला होते.
वाणिज्य आणि विधी शाखेचे पदवीधर असलेल्या मदान यांनी युनाटेड किंगडम येथे विकास व प्रकल्प नियोजन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त म्हणून मदान यांनी सुमारे पाच वर्ष दोन महिने काम पाहिले आहे. या काळात मुंबईतील विविध विकास प्रकल्प, मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला अंतिम रूप देण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले आहे.
नांदेड मधील देगलूर उप विभागात सहायक जिल्हाधिकारी म्हणून मदान यांची सर्वप्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी औरंगाबाद, अतिरीक्त जिल्हाधिकारी मुंबई झोपडपट्टी नियंत्रक, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त, नांदेडचे जिल्हाधिकारी, केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभागात उप सचिव, एमएमआरडीए मध्ये प्रकल्प संचालक (एमयुटीपी), म्हाडाचे उपाध्यक्ष, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आदी विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.