झोपमोड झाल्यानं डॉक्टर चिडला, मुलाच्या डोक्यात टॉर्च मारला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 12:07 PM2018-05-29T12:07:33+5:302018-05-29T13:33:06+5:30

सहा वर्षीय मुलाच्या डोक्याला दुखापत

UPSET AT BEING WOKEN UP AND CALLED TO WORK Doctor HITS CHILD WITH TORCH | झोपमोड झाल्यानं डॉक्टर चिडला, मुलाच्या डोक्यात टॉर्च मारला!

झोपमोड झाल्यानं डॉक्टर चिडला, मुलाच्या डोक्यात टॉर्च मारला!

Next

मुंबई: तपासणी करण्यासाठी झोपेतून उठवल्याचा राग आल्यानं एका डॉक्टरनं सहा वर्षांच्या मुलाच्या डोक्यात टॉर्च मारल्याची धक्कादायक घटना सेंट जॉर्ज रुग्णालयात घडली. यामुळे सहा वर्षांच्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टॉर्च लागल्यानंतर मुलाच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्यावर डॉक्टर तिथून निघून गेला. गौरव मौर्या असं या डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी मौर्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

विक्रोळीचा रहिवासी असणाऱ्या सहा वर्षांच्या सूर्यांश गुप्ताला कैची लागल्यानं रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री त्याला त्रास होत असल्यानं त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टर गौरव मौर्या यांना बोलावलं. मौर्या यांनी सुरुवातीला डोळ्यांच्या तपासणीसाठी टॉर्च सुरु केला. त्यावेळी अतिशय त्रास होत असल्यानं सूर्यांश रडू लागला. त्यामुळे मौर्या तिथून निघून गेले. थोड्या वेळानं पुन्हा सूर्यांशला त्रास झाल्यावर त्याच्या कुटुंबियांनी मौर्या यांना बोलावलं. त्यावेळी मौर्या झोपले होते. त्रास होत असल्यानं सूर्यांश तपासताना मौर्या यांना सहकार्य करत नव्हता. त्यामुळे झोपमोड झालेल्या मौर्या यांनी त्यांच्या हातात असलेला टॉर्च जोरात सूर्यांशच्या डोक्यावर मारला. त्यामुळे रक्तस्राव सुरु झाला. मात्र त्याकडे न पाहता मौर्या तिथून निघून गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. 

मौर्या यांनी टॉर्च मारल्यामुळे सूर्यांशच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. मौर्या यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रुग्णालय प्रशासनानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. याशिवाय रुग्णालय प्रशासनानं मौर्या यांना सक्तीच्या रजेवरदेखील पाठवलं आहे. 
 

Web Title: UPSET AT BEING WOKEN UP AND CALLED TO WORK Doctor HITS CHILD WITH TORCH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.