चिरनेर : तालुक्याच्या महसूल आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन उरण समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला विविध प्रकल्प आणि गावक-यांनीही सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले आहे. करंजा प्रवासी जेट्टीला लागून एक सिमेंट काँक्रीटचा दगडी पाया बांधला गेला आहे तर खोपटे परिसरातील एका कंटेनर यार्डने ही सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तालुका प्रशासनाला अशा कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. महसूल प्रशासनाचे प्रमुख म्हणून उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, तालुक्यात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे सांगतानाच तालुक्यात सध्या कुठे कुठे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले आहे याबाबत आपल्याला माहिती नसून लवकरच त्याबाबतची माहिती घेतो, असे त्यांनी बोलताना सांगितले.उरण तालुका परिसरातील शहर सीमेवरील मोरा विभागातील बहुतांशी इमारती या सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाकडून याबाबत आजतागायत कोणीही ठोस कारवाई करीत नसल्याने सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचे मात्र चांगलेच फावले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातल्या नैसर्गिक नाल्यांच्या बाजूला असणाऱ्या स्वमालकीच्या शेतीमध्ये एखादा उद्योग व्यवसाय उभारावा तर त्यासाठी सीआरझेड कायदा आडवा येत आहे. मात्र ज्यांनी असे कायदे तुडविले आहेत त्यांच्यावर ठोस अशी कोणतीही कारवाई केली जात नाही. तालुकाभरात आधीच महसूल विभागाचे नियम पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असताना सीआरझेड कायदा मोडणाऱ्यांविरोधातही प्रशासनाकडून स्वत:हून कारवाईचे हत्यार उगारताना दिसत नाही. प्रशासनाला याबाबत कोणीतरी नागरिकाने तक्रार करावी, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)
उरणचे समुद्रकिनारेच होताहेत गिळंकृत!
By admin | Published: November 06, 2014 11:01 PM