मुंबई : महानगरपालिकेचे केवळ प्राथमिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य असते. तथापि, मुंबई महापालिका प्राथमिकच नव्हे, तर नागरी दायित्व स्वीकारून सर्व पद्धतींच्या सेवा-सुविधा देत आहे. महापालिक ा स्वत:ची धरणे, वैद्यकीय महाविद्यालये, अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन कक्ष, यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महापालिका विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे, यामुळे आशिया खंडात मुंबई महापालिका ही आपल्या कर्तव्यात अग्रेसर व अद्वितीय असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. विष्णुप्रसाद नंदराय देसाई महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील, नव्याने सुरू केलेल्या ट्रॉमा अतिदक्षता विभाग व नवजात शिशू अतिदक्षता अतिरिक्त विभागाचे उद्घाटन, तसेच डायलिसिस केंद्राचा शुभारंभ मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार अॅड. अनिल परब, आमदार तृप्ती सावंत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, स्थानिक नगरसेविका पूजा महाडेश्वर, नगरसेवक अनिल त्र्यंबककर, दीपक भूतकर, माजी नगरसेवक सुभाष सावंत, विश्वनाथ महाडेश्वर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, रजनी मेस्त्री, तसेच डॉक्टर्स, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.महापौर म्हणाल्या की, ‘डॉ. व्ही. एन. देसाई महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात ट्रॉमा अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता अतिरिक्त विभाग व डायलिसिस केंद्राची गरज होती. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतला. या आरोग्य सेवा-सुविधांचा पश्चिम उपनगरातील नागरिकांना फायदा होईल.’ आमदार अॅड. अनिल परब म्हणाले की, ‘डॉ. व्ही. एन. देसाई महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेल्या सेवा-सुविधांमुळे महापालिकेच्या इतर रुग्णालयांवरील भार कमी होईल.’ त्यासोबतच या भागातील स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे म्हणाले की, ‘डॉ. व्ही. एन. देसाई महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. नागरी दायित्व आणि मुंबईकरांचे हित पाहून आरोग्य विभागावर खर्च करण्यात येतो.’ (प्रतिनिधी)
नागरी दायित्वात पालिका अग्रेसर
By admin | Published: December 28, 2016 3:37 AM