शहरी नक्षलवाद प्रकरण : तेलतुंबडेंना १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:47 AM2019-02-06T06:47:23+5:302019-02-06T06:47:40+5:30
नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने ११ फेबु्रवारीपर्यंत पुढे ढकलली.
मुंबई : नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने ११ फेबु्रवारीपर्यंत पुढे ढकलली. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. त्यामुळे तेलतुंबडे यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.
आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एम.डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठापुढे होती.
तेलतुंबडे यांना २ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावरून पहाटे साडेतीनच्या सुमारास अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळताना त्यांना ११ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण देत संबंधित न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर तेलतुंबडे यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. १ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. २ फेबु्रवारी रोजी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना मुंबई विमानतळावरून पहाटे अटक केली.
सर्वोच्च न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असताना पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदा आहे, असे म्हणत पुणे सत्र न्यायालयाने पोलिसांना त्यांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एल्गार परिषदेमध्ये अनेक जणांनी चिथावणीखोर भाषणे दिल्याने दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली. शहरी नक्षलवाद प्रकरणी पोलीस तपास करत असताना या घटनेशी तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांकडून न्यायालयाला आश्वासन
राज्य सरकारने त्यांच्या याचिकेवर जोरदार आक्षेप घेत ११ फेब्रुवारीपर्यंत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागितला. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले.