रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:27+5:302021-07-21T04:06:27+5:30
आराखडा तयार करण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात उर्दू भाषेची वाङ्मयीन ...
आराखडा तयार करण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात उर्दू भाषेची वाङ्मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दू घरे (भवन) उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
उर्दू भवन बांधण्याविषयी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन बांधण्याच्या प्रकल्पाला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भाषिक जनसमुदाय मोठ्या प्रमाणात आहे. उर्दू भाषेच्या वाङ्मयीन प्रगती आणि समृद्धी व्हावी, ही जनभावना लक्षात घेऊन जिल्ह्यात उर्दू भवन उभारून, या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे कार्य केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जागाही उपलब्ध असून, सर्व निकष पूर्ण होत आहे. या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असून, उर्दू भवन उभारण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून अल्पसंख्याक विभागाकडे सादर करावा, असेही सामंत यांनी सांगितले.
उर्दू भवनात कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक उर्दू भवनासाठी स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार, या समितीची लवकर स्थापना करून, त्यामध्ये उर्दू अभ्यासकांचा समावेश करावा, असे निर्देशही सामंत यांनी यावेळी दिले.