ठळक मुद्देशिवसेनेच्या शिवशाही कॅलेंडरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेखकॅलेंडरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचाही एकेरी उल्लेख
शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून आता भाजपानं शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात उर्दू मजकूरासह शिवसेनेनं शिवशाही हे कॅलेंडर छापलं असून त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवशाही कॅलेंडरचा फोटो टॅग करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवशाही कॅलेंडरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी यासोबत "शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही...," असं म्हणत खोचक टोला लगावला. "शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही," असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. "अजान स्पर्धेचं आयोजन केलं त्यावेळीच मी म्हटलं होतं की शिवसेनेनं आता भगवा तर सोडलाच केवळ हिरवा हाती घेणं बाकी आहे. वडाळा विधानसभेच्या शिवसेनेनं उर्दूमध्येच कॅलेंडर काढलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जनाब बळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे. यामध्ये उर्दू, मुस्लीम कॅलेंडरप्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदयही देण्याचं काम केलं. याव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतींच्या दिवशी केवळ शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस यातून करण्यात आलं आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो," असंही ते म्हणाले. औरंगाबादचं संभाजीनगर नाही पण मतांच्या लालसेपायी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नामांतरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं करून दाखवलं असल्याचंही ते म्हणाले.या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं नमूद करण्यात आलं आहे. यावर मराठी इंग्रजीसोबतच उर्दू भाषेचाही वापर करण्यात आला आहे. तसंच यावर एका ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे आणि जनाब आदित्य ठाकरे असा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. तसंच त्यात हिंदुत्वाबद्दलही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही’, असं म्हटलं होतं. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित करण्याचं वक्तव्य केल्यानं विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. परंतु त्यानंतर सकपाळ यांनी अजान स्पर्धेशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं.