मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘भविष्य का भारत’ या पुस्तकाचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. ५ एप्रिलला त्याचे प्रकाशन होईल; मात्र यासाठी राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने (एनसीपीयूएल) घेतलेल्या पुढाकाराबाबत उर्दू साहित्यिकांनी आक्षेप घेतला आहे. हा ‘एनसीपीयूएल’च्या निधीचा गैरवापर असल्याची टीकाही त्यांनी केली.भागवत यांनी लिहिलेल्या ‘भविष्य का भारत’ या पुस्तकाचे अकिल अहमद यांनी उर्दूत भाषांतर केले आहे. या भाषांतरित पुस्तकाला ‘मुस्तकबिल का भारत’ असे नाव देण्यात आले आहे. रा. स्व. संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्या हस्ते ५ एप्रिलला या पुस्तकाचे प्रकाशन होईल.मात्र, या पुस्तकाच्या भाषांतरापासून प्रकाशनापर्यंत ‘एनसीपीयूएल’ घेत असलेल्या पुढाकाराबाबत उर्दू साहित्यिकांनी आक्षेप घेतले. कित्येक उर्दू साहित्यिक निधीअभावी साहित्य प्रकाशित करू शकत नाहीत. मग या पुस्तकाबाबत इतकी तत्परता का, हा ‘एनसीपीयूएल’च्या निधीचा गैरवापर नव्हे का, असे सवाल दिल्ली येथील उर्दू अकादमीचे माजी उपाध्यक्ष माजिद देऊबंदी यांनी उपस्थित केले. हे पुस्तक एका विशिष्ट संस्थेच्या विचारसरणीचा पुरस्कार करते. निधी खर्च करून ‘एनसीपीयूएल’ने नियमांची पायमल्ली केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.२०१८ मध्ये सरसंघचालकांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात तीन दिवसांची व्याख्यानमाला घेतली होती. त्यात त्यांनी केलेल्या भाषणांचा या पुस्तकात समावेश आहे.राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने याआधी भगवद्गीता, गुरुग्रंथ साहिब यांसारखे धार्मिक ग्रंथ उर्दूत भाषांतरित करून प्रकाशित केले आहेत. ‘मुस्तकबिल का भारत’ हे पुस्तक म्हणजे नव्या भारताबाबत दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह आहे. यात काहीही गैर नाही.- अकिल अहमद, संचालक, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद
सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दूत भाषांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 2:11 AM