मुंबई - आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादामुळे चर्चेत होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलवरुन तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा वाद महाराष्ट्रात चांगलाच रंगला, अखेर महिला आयोगानेही यात लक्ष घातलं होतं. त्यामुळे, उर्फी विरुद्ध चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपल्याचा पाहायला मिळालं. उर्फीही बिनधास्तपणे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत परखडपणे भूमिका मांडत होती. आता, उर्फी केलेल्या ट्विटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
उर्फीसाठी तिच्या कपड्यांवरून प्रसिद्धी मिळवणे ही काही नवीन गोष्ट नाही, दोनच दिवसांपूर्वी ती पुन्हा एकदा विचित्र ड्रेसमध्ये दिसली होती, तिच्या या नव्या लूकचीही चर्चा झाली. नेटीझन्सने तिला कमेंट करुन ट्रोलही केलं. आता, उर्फीने मुंबईत आपल्याला भाड्यानं घर मिळत नसल्याची तक्रार ट्विटरवरुन केली आहे. विशेष म्हणजे मला कुणीच घर देत नसल्याचं तिने म्हटलं. मला हिंदू घर देत नाहीत, मुसलमानही देत नाहीत. त्यासह इतरही कुणीची भाड्यानं घर देत नाहीत, अशी व्यथाच उर्फीने मांडली आहे.
मी जे ड्रेस परिधान करते, किंवा माझ्या पोशाखामुळे मुस्लीम मला घर देत नाहीत. तर, मी मुस्लीम आहे म्हणून हिंदू मला घर देत नाहीत. राहिलेले काही लोकं मला राजकीय व्यक्तींच्या धमक्यांमुळे घर देत नाहीत. मुंबईत भाड्यानं घर शोधणं खूप कठीण काम बनलंय, असे म्हणत उर्फी जावेदने ट्विटरवरुन आपली व्यथा मांडली आहे. दरम्यान, उर्फीच्या या ट्विटवर नेटीझन्स तिची खिल्ली उडवत आहेत. तर, काहींना तिची समस्या ही आमच्यासारखीच समस्या असल्याचं म्हटलं.