उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीवर तातडीने कार्यवाही करा, महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 10:05 PM2020-04-28T22:05:35+5:302020-04-28T22:49:33+5:30
महाविकास आघाडीच्या नेत्यांआधी भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
मुंबई : विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशीवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या नियुक्तीबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही, त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर तातडीने कार्यवाही करावी, अशा विनंतीचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.
Maharashtra: Maha Vikas Aghadi leaders met Governor Bhagat Singh Koshyari today to discuss and request him to consider yesterday's cabinet proposal for the nomination of CM Uddhav Thackeray in the state's Legislative Council. pic.twitter.com/CHnGJUA8n8
— ANI (@ANI) April 28, 2020
दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात राज्यातील स्थितीवर चर्चा होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, याबाबत चर्चा झाली की नाही, हे कळू शकले नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांआधी भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे, असा आरोप भाजपाने राज्य सरकारवर केला आहे.