कर्करोगाला प्रतिकार करणाऱ्या औषधांचा अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:01 AM2019-07-12T06:01:13+5:302019-07-12T06:01:18+5:30
जागतिक आरोग्य संघटनेची यादी जाहीर
- स्नेहा मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रासमोरील कर्करोगाचे आव्हान पाहता जागतिक आरोग्य संघटनेने पाच कर्करोगांच्या औषधांचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या यादीत केला आहे. नुकतीच ही यादी संघटनेने जाहीर केली असून यात पहिल्यांदाच वैद्यकीय चाचण्यांचाही समावेश आहे. कर्करोगाचे उपचार सुरू असताना रुग्णांची प्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अत्यावश्यक औषधांच्या यादीत त्वचा, फुप्फुस, मूत्राशय, रक्त आणि बोन मॅरो कर्करोगांच्या औषधांचा प्रामुख्याने समावेश केला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी कर्करोगांच्या उपचारपद्धतीत आलेली इम्युनोथेरपीच्या साहाय्याने कर्करोगावर नियंत्रण मिळविता येते. या निर्णयाच्या माध्यमातून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल, असे मत टाटा रुग्णालयाचे ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांनी व्यक्त केले आहे. डॉ. बाणावली यांनी सांगितले की, जाहीर झालेल्या यादीप्रमाणे औषधांचा अवलंब करून कर्करोगावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. परंतु, इम्युनोथेरपी घेणाºया रुग्णांचे प्रमाण टाटा रुग्णालयात अत्यंत अल्प आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादीतील औषधांचा भारतातील वापर अल्प आहे. खर्चीक असलेल्या या औषधांचा परिणाम प्रभावी आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादीत २८ औषधे प्रौढांसाठी, तर २३ बालकांसाठीची औषधे आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एकूण ४६० औषधांचा समावेश यात आहे. ६९ वैद्यकीय चाचण्या समाविष्ट आहेत. त्यात अॅनिमिया, थायरॉइड, सिकलसेल आहेत. रक्तसंक्रमण सुरक्षित व्हावे या दृष्टिकोनातून रक्त चाचण्याही यात आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदा जागतिक आरोग्य संघटनेने अत्यावश्यक औषधांची यादी घोषित केली होती. त्यात क्षयरोग, एचआयव्ही, मलेरिया आणि कावीळ या आजारांवर लक्ष केंद्रित केले होते.
देशासमोर आव्हान
भारतीय वैद्यकीय परिषदेच्या कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन विभागाने महिला कर्करुग्णांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिकांना गर्भाशय, स्तनपेशींचा कर्करोग असल्याचे म्हटले आहे. भारतीय कर्करोग संस्थेच्या अभ्यासानुसार देशात सात टक्के रुग्ण फुप्फुस कर्करोगाचे असतात. त्यातील अनेक रुग्ण हे दुसºया किंवा तिसºया श्रेणीत उपचारासाठी येत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे