मुंबई : काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली.यानंतर काँग्रेसच्या वतीने उत्तर मुंबईत ऊर्मिला मातोंडकर यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी ऊर्मिला यांनी जोरदार भाषण ठोकत भाजपवर हल्ला चढविला. बकबक करणे, पोपटपंची करणे ही भाजपची स्टाइल आहे. माझी स्टाइल नेहमीच काम करण्याची आहे. कोत्या मनोवृत्तीचे लोक माझ्या लग्न आणि धर्मावरून वाद निर्माण करत आहेत. मी त्यांना महत्त्व देत नाही. मी प्रामाणिकपणे मत मागणार आहे. मी मुंबईकर आहे, मराठी असल्याचे कार्डही अजिबात खेळणार नाही , असे त्यांनी म्हटले.ऊर्मिला यांनी साडी नेसली होती. यावर, तुम्ही इंदिरा गांधींचा आदर्श ठेवला आहे का, त्यांना फॉलो करीत आहात का, असे प्रश्न ऊर्मिला यांना विचाले गेले. त्यावर त्यांच्यासारखे कपडे घालून काही होणार नाही. आचारविचार अवलंबिले पाहिजेत, तेच महत्त्वाचे आहे.अनेक धक्कादायक निकालया मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. २००४ साली ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेता गोविंदाला मैदानात उतरविले होते. काँग्रेसची ही खेळी यशस्वी ठरली. २००९ साली गोविंदाने माघार घेतल्याने संजय निरुपम यांना उमेदवारी मिळाली आणि मनसे फॅक्टरमुळे तेही यशस्वी ठरले. सेलिब्रिटी विरुद्ध राजकीय कार्यकर्ता अशा लढाईमुळे पुन्हा ‘गोविंदा इफेक्ट’ नाही ना होणार, अशी धास्ती भाजप पदाधिकाऱ्यांना आहे.
ऊर्मिलाच्या एन्ट्रीने उत्तर मुंबईत चुरस; भाजप कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:27 AM