मुंबईशिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सक्रियरित्या पक्षाच्या कामाला सुरुवात देखील केली आहे. शिवसेनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेत उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील कूपर रुग्णालयात रक्तदान केलं आहे.
मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं. यात उर्मिला मातोंडकर यांनी पुढाकार घेत अंधेरी येथील शिवसैनिक संजय कदम यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपस्थिती लावली. याबाबतचं एक ट्विटकरुन उर्मिला यांनी माहिती दिली आहे.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शिवसेनेच्या पुढाकारातून अंधेरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात योगदान देता आलं याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजते. रक्ताच्या तुटवड्यामुळे कोविड काळात अशा शिबिराचं आयोजन केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार", असं ट्विट उर्मिला यांनी केलं आहे.