मुंबई : मुंबईतील काँग्रेस नेत्यांवर विश्वासघाताचा गंभीर आरोप करत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत शह-काटशहाच्या राजकारणात माझा वापर होऊ द्यायचा नसल्याचे त्यांनी आपल्या सविस्तर निवेदनात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षातील काही नेत्यांनी सहकार्य न केल्याची ऊर्मिला यांची भावना होती. त्याबाबत त्यांनी पक्षाचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना १६ मे रोजी पत्र पाठविले होते. मात्र, हे गोपनीय पत्र पद्धतशीरपणे माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आले. तेव्हाच राजीनाम्याचा विचार मनात आल्याचे ऊर्मिला यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर वारंवार निषेध करूनही याबाबत खेद व्यक्त करण्याची तसदीही कोणी घेतली नाही. शिवाय, ज्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होता, त्यांनाच जाब विचारण्याऐवजी चांगली पदे देण्यात आली,’ असा आरोप ऊर्मिला यांनी केला.
मुंबई काँग्रेसमध्ये मला व्यापक उद्दिष्टांसाठी काम करायचे होते. मात्र, पक्षात महत्त्वाच्या पदांवर असलेल्या नेत्यांना पक्षबांधणीत रस नाही किंवा त्यांच्यात तशी क्षमता नाही. पक्षांतर्गत राजकारणासाठी मला स्वत:चा वापर होऊ द्यायचा नाही. काँग्रेसमधून बाहेर पडले तरी विचारधारेसाठी आणि लोकांसाठी काम करत राहणार असल्याचे ऊर्मिलाने स्पष्ट केले आहे.