उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (tirath singh rawat) यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा घडत आहेत. रावत यांच्या विधानानंतर अनेक महिला नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. त्यात आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (urmila matondkar )यांनीही ट्विट करत रावत यांच्या विधानावरुन भाजपला टोला लगावला आहे. (urmila matondkar slams uttarakhand cm tirath singh rawat)
"फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा नक्की सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय करणार?", असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थित केला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी देहरादून येथील कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता. तिला विचारलं तेव्हा तिनं स्वयंसेवी संस्था चालवत असल्याचं सांगितलं. पण गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती जर एनजीओ चालवत असेल तर लहान मुलांवर काय संस्कार होतील”, असं विधान रावत यांनी केलं होतं.
रावत यांच्या विधानानंतर एकच गदारोळ उडाला आणि देशातील अनेक महिला नेत्यांसोबत अभिनेत्रींनीही रावत यांच्यावर टीका केली. "आमचे कपडे बदलण्याआधी स्वत:ची मानसिकता बदला", अशा शब्दांत बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिनं ट्विट करत रावत यांना फटकारलं होतं. तर अभिनेत्री गुल पनागनंही रावत यांना निशाण्यावर धरलं होतं.