Join us

रंगीला गर्ल ऊर्मिला मातोंडकर कॉंग्रेसतर्फे रिंगणात?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 6:05 AM

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा शोध अखेर संपला. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसने रंगीला गर्ल, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा शोध अखेर संपला. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसने रंगीला गर्ल, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत ऊर्मिला विरुद्ध विद्यमान खासदार आणि भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईऐवजी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा हट्ट धरल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला होता. मुंबई अध्यक्षांनीच आपल्या मतदारसंघातून पळ काढल्यास चुकीचा संदेश जाईल, असा निरुपमविरोधी गटाचा युक्तिवाद होता. अखेर मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्षपदावर पाणी सोडत निरुपम यांनी उत्तर पश्चिमची उमेदवारी मिळवली. त्यामुळे उत्तर मुंबईतील उमेदवार जाहीर करण्यातील अडथळा दूर झाला आहे. उत्तर मुंबईतून भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे बाहेरून एखादे प्रसिद्ध नाव अथवा एखाद्या सेलीब्रिटीला मैदानात उतरविण्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू होती. २००४ साली अभिनेता गोविंदा याला मैदानात उतरविण्याची काँग्रेसची खेळी यशस्वी झाली होती. गोविंदाने भाजपाचे नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. अशीच खेळी पुन्हा करावी यासाठी काँग्रेसकडून अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन, राज बब्बर, गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक, अभिनेत्री शिल्पा शिंदे, आसावरी जोशी अशी नावे पुढे केली जात होती. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी या नावांना नकार दिल्याचे समजते. उर्मिलाच्या उमेदवारीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी तिच्यामुळे पुन्हा एकदा गोविंदा इफेक्ट घडेल, असा दावा स्थानिक काँग्रेस नेते करत आहेत.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरलोकसभा निवडणूक