Join us

ऊर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतूनच उमेदवारी का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 4:55 AM

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळाल्यास त्यांना काँग्रेसची २५ ते ३५ टक्के पारंपरिक मते, समाजवाद्यांची मते व अभिनेत्री म्हणून असलेल्या करिश्मा यांतून तरुण व मध्यमवयीन मतदारांची मते मिळू शकतील, असा विचार काँग्रेसने केला असल्याचे दिसते.उत्तर मुंबई मतदारसंघ पूर्वी गोरेगाव ते पालघर होता. आता तो गोरेगाव ते दहिसर इतकाच आहे. एके काळी समाजवाद्यांचे तिथे प्राबल्य होते. मृणाल गोरे याही येथूनच लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. हे समाजवादी मतदार भाजपापेक्षा काँग्रेसला मते देतील, हे मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचे एक कारण दिसते. शिवाय ऊ र्मिला मातोंडकर यांचे वडील समाजवादी चळवळीत पूर्वी सक्रिय होते आणि आजही त्यांचा येथील समाजवादी मंडळी व संस्था यांच्याशी संबंध आहे. त्याचा फायदा ऊ र्मिला यांना होईल, असा काँग्रेसचा अंदाज असावा.याशिवाय या मतदारसंघातून भाजपाचे सहा वेळा तर काँग्रेसचे तीन वेळा उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच जनता पार्टीचे उमेदवार मृणाल गोरे व रवींद्र वर्मा हेही येथून निवडून आले होते. त्यामुळे येथून आपण चांगला उमेदवार निवडून दिल्यास तो निवडून येईल, असेही काँग्रेसचे गणित असावे. काँग्रेसतर्फे अभिनेता गोविंदा व संजय निरुपम यांनी येथूनच राम नाईक यांचा दोनदा पराभव केला होता. यंदा तसाच विचार काँग्रेसने केल्याचे दिसते.या मतदारसंघातील गोरेगाव पूर्व व पश्चिम, मालाडचा मालवणी, कांदिवलीतील चारकोप, डहाणुकर वाडी, बोरिवलीतील गोराई, पूर्वेकडील म्हाडा कॉलनी, अशोक नगर आदी भागांत मराठी वस्ती मोठी आहे. कापड गिरण्या बंद पडल्यावर बरेच कामगार गोराई, चारकोप भागात स्थायिक झाले आहेत. त्यामुळेच काँग्रेसने मराठी चेहरा देण्याचे ठरविल्याचे दिसते. याशिवाय गोरेगाव, मालाड व बोरिवली येथे ख्रिश्चन मतदारांचे प्रमाण मोठे आहे, तर मालवणीमध्ये मुस्लीम मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. ही मते काँग्रेसकडे वळण्याची शक्यता अधिक आहे.मतदारसंघात उत्तर भारतीय व गुजरातीमतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापैकी गुजराती मते भाजपाची मानली जातात. पण उत्तर भारतीय मतांसाठी सपा वा बसपाने उमेदवार उभा न केल्यास त्यापैकी बरीच मते काँग्रेसकडे वळू शकतील. गेल्या वेळी भाजपाने बिहार व उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या उत्तर भारतीयांच्या वस्त्यांत सभा घेतल्या. भाजपाचे गुजरातमधील नेतेही येथे आले होते. मात्र ऊर्मिला यांचा या मतदारसंघाशी संबंध नाही. त्यांना उन्हात फिरून मते मागण्याची सवयही नाही. ते सर्व त्यांना करावेच लागेल. गोविंदा यांनी ते केले आणि निवडून आले.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरलोकसभा निवडणूक