लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुकीला अजून मुहूर्त मिळत नसताना एकनाथ खडसे, राजू शेट्टी, ऊर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफर हुसेन, अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांच्या शिफारशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे .
विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा या हेतूने राज्यपाल नामनियुक्त आमदार नेमण्याची घटनेत तरतूद आहे. सामाजिक सेवा, विज्ञान, कला, साहित्य, सहकार चळवळ या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड करण्याची तरतूद घटनेत आहे. या तरतुदीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांच्या नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी हे म्हणणे फेटाळून लावलेले असून, हे म्हणणे आधारहीन असल्याचे प्रतिपादन केलेले आहे.
ऊर्मिला मातोंडकर, राजू शेट्टी, एकनाथ खडसे, सचिन सावंत यांनी स्वतः च्या आयुष्यात केलेली साहित्य, कला, समाज सेवा, सहकार सेवा एका मिनिटात संपून त्यांच्यावर राजकीय शिक्का मारणे हा त्यांच्या कार्याचा अपमान आहे. ऊर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली म्हणजे त्यांनी ४० वर्षे अभिनयसृष्टीत केलेले काम संपले काय, असा संतप्त सवाल धनंजय जुन्नरकर यांनी उपस्थित केलेला आहे.
ऊर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेनेच्या यादीत गेले किंवा कुठल्याही पक्षाच्या यादीत गेले असेल तरी त्यामुळे त्यांनी केलेली चित्रपटसृष्टीची सेवा व्यर्थ झाली असे आपण म्हणायचे का? असा उलट प्रश्न त्यांनी विचारला आहे.
राज्यपालांनी लवकरात लवकर सदर बाबींचा सोक्षमोक्ष लावून १२ आमदारांची नियुक्ती घोषित करावी किंवा ऊर्मिला मातोंडकर यांच्या नावाची घोषणा तरी त्वरित करावी, अशी विनंती धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.
--------------------------------------------