कामा रुग्णालयात सुरू होणार युरोगायनॅक सेंटर; सरकारी रुग्णालयातील पहिलेच केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:06 AM2024-10-04T09:06:20+5:302024-10-04T09:06:30+5:30

महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात ओटीपोटाचे आजार आढळतात. त्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा मूत्ररोगतज्ज्ञ उपचार करतात.

Urogynac Center to be started at Kama Hospital; The first center in a government hospital | कामा रुग्णालयात सुरू होणार युरोगायनॅक सेंटर; सरकारी रुग्णालयातील पहिलेच केंद्र

कामा रुग्णालयात सुरू होणार युरोगायनॅक सेंटर; सरकारी रुग्णालयातील पहिलेच केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  वैद्यकीय विश्वात विविध आजारांवर अत्याधुनिक उपचार करण्यात येत आहेत. नवीन उपचार पद्धती विकसित केली जात आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील कामा रुग्णालयात युरोगायनॅक सेंटर (ओटीपोटाच्या आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र केंद्र) सुरू केले जाणार आहे. अशा पद्धतीचे हे सरकारी रुग्णालयातील पहिले केंद्र असून, येत्या काळात या विषयावरील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे एक वर्षाचा फेलोशिप कोर्ससुद्धा सुरू करण्यात येणार आहे. 

महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात ओटीपोटाचे आजार आढळतात. त्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा मूत्ररोगतज्ज्ञ उपचार करतात. मात्र, या दोन्ही विषयांचा एकत्रित अभ्यास केलेले  तज्ज्ञ देशात कमी आहेत. हे सेंटर चालू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या डॉ. अपर्णा हेगडे यांनी त्याबाबतचे प्रशिक्षण परदेशात घेतले असून, त्या आता गरीब रुग्णांसाठी सेवा देणार आहेत. 

मानद सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे त्यांनी खासगी कंपनीच्या सीएसआर निधीतून मोठी रक्कम मिळवून हे सेंटर उभारले आहे.

नवजात शिशू आयसीयूचे नूतनीकरण  
कामा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग आहे. त्याचे नूतनीकरण करण्यात करण्यात आले आहे. या विभागात २१ खाटा आहेत. तसेच अत्याधुनिक व्हेंटिलेटरही बसविण्यात आले आहे. शिवाय, संसर्ग टाळण्यासाठी दरवाजांना सेन्सर बसवले आहेत.

ओटीपोटाच्या दुखण्यांवर मोफत उपचार
महिलांना होणाऱ्या ओटीपोटाच्या आजारांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, गर्भाशय खाली येणे, लघवीवर नियंत्रण नसणे  (वारंवार लघवीला जावे लागणे), लघवीची पिशवी खाली येणे, गुदद्वाराची जागा खाली येणे, युरिनरी फिस्तुला आदी आजारांचा समावेश होतो. या आजारांवर आता युरोगायनॅक सेंटरमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 

राज्यातील सरकारी रुग्णालयांत अशा प्रकारचे हे पहिले सेंटर आहे. या सेंटरमध्ये अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ओटीपोटातील आजारांचे निदान आणि मोफत उपचार करण्यात येतील. त्यासाठी खासगी रुग्णालयात जाण्याची गरज नाही. 
    - डॉ. अपर्णा हेगडे,     तज्ज्ञ, युरोगायनॅक सेंटर 

युरोगायनॅक सेंटरचा गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. हे सेंटर आणि नवजात अतिदक्षता विभागाचे उदघाटन लवकरच होणार आहे. 
    - डॉ. तुषार पालवे,
    अधीक्षक, कामा रुग्णालय

Web Title: Urogynac Center to be started at Kama Hospital; The first center in a government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.