Join us

अमेरिकन राजदूतांचे मुंबई दर्शन; वडापाववर मारला ताव तर शाहरुख खानची 'मन्नत'वर भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 8:56 PM

भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत एरिक गार्सेटी यांनी मुकेश अंबानीसह अनेकांच्या भेटी घेतल्या.

मुंबई: भारतात अमेरिकेचे नवे राजदूत आले आहेत. एरिक गार्सेटी (Eric Garcetti) असे त्यांचे नाव असून, त्यांनी मुंबई दर्शनाचा आनंद लुटला. एरिक गार्सेट्टी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान मराठी खाद्यपदार्थ खाण्यापासून बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या भेटीही घेतल्या. त्यांच्या या मुंबई दर्शनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

एरिक गार्सेटी यांनी मुंबई दर्शनात अनेक ठिकाणी भेटी दिल्या. सुरुवातीला त्यांनी मुंबईतील लोकप्रिय वडापाववर ताव मारला. यानंतर त्यांनी मुंबा देवी मंदिर, जामा मशीद मार्गे मन्नत गाठले. यावेळी ते बॉलिवूड स्टार शाहरुख खानला भेटले. त्यांनी ट्विटमध्ये या भेटीचे बॉलीवूड पदार्पण असे वर्णन केले आहे. “या शहरात परत येणे खूप छान आहे. मी इथे पहिल्यांदा आलो तेव्हा मी तरुण होतो. मी लॉस एंजेलिसचा 42 वा महापौर म्हणून काम केले आहे आणि मला वाटते की, मुंबई अनेक अर्थाने लॉस एंजेलिससारखी आहे.'' असे ते म्हणाले.

मुंबई आणि गुजरातच्या दौऱ्यात गार्सेटींच्या 48 तासांत अनेक बैठका झाल्या. शाहरुख खान व्यतिरिक्त त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री पटेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उद्योगपती मुकेश अंबानी आणि अमित शहांचे सुपूत्र जय शाह यांचीही भेट घेतली. याआधी गार्सेटी यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. तेथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आणि 'चरखा' चालवला.  

टॅग्स :अमेरिकाशाहरुख खानमुंबईमुकेश अंबानी