यूएस क्लबने साधली जेतेपदाची हॅट्ट्रीक
By admin | Published: February 6, 2017 01:18 AM2017-02-06T01:18:07+5:302017-02-06T01:18:07+5:30
बलाढ्य युनायटेड सर्विसेस क्लबने (यूएस क्लब) प्रतिष्ठेच्या २१व्या आंतर क्लब अजिंक्यपद गोल्फ स्पर्धेतील आपला दबदबा सिध्द करताना दिमाखदार विजेतेपद पटकावले.
मुंबई : बलाढ्य युनायटेड सर्विसेस क्लबने (यूएस क्लब) प्रतिष्ठेच्या २१व्या आंतर क्लब अजिंक्यपद गोल्फ स्पर्धेतील आपला दबदबा सिध्द करताना दिमाखदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा विजेतेपदावर शिक्का मारताना यूएस क्लबने शानदार हॅट्ट्रीकची नोंद केली. त्याचवेळी मुंबईच्या वेलिंग्टन स्पोटर््स क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
चेंबुर येथील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबवर (बीपीजीसी) झालेल्या या स्पर्धेत अटीतटीची लढत पहायला मिळाली. शनिवार - रविवार अशा दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी यूएस क्लब आणि वेलिंग्टन संघ यांच्यामध्ये १४.५ अशी बरोबरी झाली होती. परंतु, स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी यूएस क्लबने आपला हिसका दाखवताना कमालीचे सातत्य राखत मोठ्या अंतराने बाजी मारली. अंतिम दिवशी यूएस क्लबने थेट २२.५ गुणांची कमाई करताना सर्वाधिक ३७ गुणांसह विजेतेपदावर कब्जा केला.
त्याचवेळी, वेलिंग्टनला स्पर्धेच्या अंतिम दिवशी केवळ १२ गुण मिळवण्यात यश आले. तर, यजमान बीपीजीसी आणि पूना गोल्फ क्लब यांना प्रत्येकी ९ गुण मिळवता आले. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या वेलिंग्टनने स्पर्धेत एकूण २६.५ गुण मिळवले. तसेच, बीपीजीसी (२०.५) आणि पूना क्लब (१९) यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
ज्युनिअर खेळाडू केशव मिश्राने अप्रतिम कौशल्य दाखवताना वेलिंग्टनच्या अर्जुन गुप्ताला नमवून यूएस क्लबला शानदार सुरुवात करुन दिली. तसेच, यानंतर सुमीत नारंग आणि अंशू खालको यांनी बाजी मारत यूएस संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यूएस क्लबने स्पर्धेच्या अंतिम दिवशी कामगिरीत कमालीचे सातत्य राखताना प्रतिस्पर्धी संघांना आपल्या आसपासही फिरकू दिले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)